छोटे इंजिनिअर्स

शालेय वयोगटामध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ओळखीचा करवून देणे असे उद्दिष्ट ठेऊन हा उपक्रम कुसगाव व कल्याण गावच्या शाळांमध्ये सुरु आहे.

 · 4 min read


शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये केंद्रामध्ये 'छोटे इंजिनिअर्स' हा उपक्रम सुरु झाला आहे. पहिलेच वर्ष असल्याने शिवापूरजवळील दोन शाळांमध्ये हा उपक्रम सुरु आहे. शालेय वयोगटामध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ओळखीचा करवून देणे असे उद्दिष्ट ठेऊन हा उपक्रम कुसगाव व कल्याण गावच्या शाळांमध्ये सुरु आहे. दोन्ही शाळांमधील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी मिळून एकूण ९१ विद्यार्थ्यांचा वर्षभर सहभाग यामध्ये आहे. आठवड्यातून एकदा दोन्ही वर्गावर एक-एक घड्याळी तासाचे सत्र यामार्फत आपण घेत आहोत. जुलै २०२३ पासून सत्र दोन्ही शाळांमध्ये नियमित सुरु आहेत. या सत्रांमध्ये २० टक्के वेळामध्ये PPT च्या आधारे माहिती देणे व बाकीच्या वेळामध्ये प्रत्यक्ष साहित्य हातात घेऊन कृती करणे असे स्वरूप असते.


याच उपक्रमातील एक महत्वाचा टप्पा आज शिवापूर केंद्रामध्ये पार पडला - छोटे इंजिनिअर्स प्रकल्प स्पर्धा २०२४

जवळपास महिन्याभरापासून प्रकल्प स्पर्धेची तयारी विद्यार्थी करत होते. आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना एकूण चार समस्या विधाने दिली होती. विद्यार्थ्यांनी स्वतःचे गट तयार करून त्यातील एक समस्या विधान निवडायचे होते. त्याच्यावर उत्तर तयार करून जमा करायचे होते. जमा झालेल्या उत्तरांवरून आपण अंतिम आठ गट निवडले जे आजच्या प्रकल्प स्पर्धेसाठी पात्र झाले.

आजच्या स्पर्धेमध्ये सकाळी १० वाजल्यापासून निवडलेल्या गटांमधील एकूण ४० विद्यार्थी केंद्रावर होते. त्यांना त्यांनी मागितलेले सर्व साहित्य व अवजारे दिली गेली व केंद्रातील मार्गदर्शकांनी मार्गदर्शनही केले आणि जवळपास तीन तासांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पात ठरवलेली वस्तू तयारही केली! या वस्तूंचे परीक्षण झाले व दोन गटांना बक्षीस देण्यात आले.

प्रकल्प करत असताना प्रकल्प मार्गदर्शकांनी तंत्रशिक्षणाचा प्रकल्प कसा करावा, त्याचे लेखन कसे करावे, त्याची एकूण किंमत कशी ठरवावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व तसे प्रकल्पाचे लेखनही विद्यार्थ्यांनी केले. सर्वात महत्वाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांनीही स्वतः हातात हत्यारे व उपकरणे घेऊन प्रकल्प पूर्ण केला. यामध्ये दोन गटांनी जिन्याच्या बाजूचे रेलिंग तयार केले, दोन गटांनी झाडांना पाणी मिळावे म्हणून ड्रीप तयार केले, दोन गटांनी सौर स्ट्रीट लाईट तयार केले व दोन गटांनी उंचीवरची फळे काढण्यासाठी यंत्र तयार केले. हे सर्व सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना समस्या विधानात दिले असल्याने यावर महिनाभर गटांमध्ये चर्चा होत होती. आजच्या आधी याचे दोनदा परीक्षण झाले होते व त्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प बनवला गेला.



छोटे इंजिनीयर्स - प्रकल्प स्पर्धा


काल पासून प्रबोधिनीच्या शिवापुर केंद्रात जणू लगीन घाई सुरू होती. मंडप, स्टेज, साऊंड सिस्टम सगळी सज्जता होती. सनई चौघडे मात्र नव्हते - त्या ऐवजी ड्रिल मशीन, grinding मशीन चे आवाज ऐकू येत होते. बुचकळ्यात पडलात ना !!

आजचा दिवस खास होता. जुलै महिन्यापासून कल्याण आणि कुसगाव मधल्या शाळांमध्ये छोटे इंजीनियर हा प्रकल्प शिवापुर कौशल्य प्रशिक्षण केंद्रमार्फत सुरू आहे. सहा महीने झाल्यानंतर विद्यार्थी किती शिकले आहेत हे कळण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केलेले होते. गेल्या महिन्यात च सर्वांना चार समस्या दिल्या होत्या आणि मुले ५-५ च्या गटाने त्यावर काम करत होती. प्राथमिक फेरी त्या त्या शाळेत च झाली आणि अंतिम फेरीसाठी प्रत्येक शाळेतून ४ असे ८ संघ आज सज्ज होते.

कोणाला तिथल्या जिन्याला वेगळ्या प्रकारचे railing करायचे होते, तर कोणाला कमीतकमी खर्चात झाडांना पाणी पोचवायचे होते, कोणाला झाडवरची फळे काढायचे हत्यार बनवायचे होते तर कोणाला अनेकदा वीज जाणाऱ्या आपल्या गावातल्या चौकात दिव्याची सोय करायची होती.

प्रत्येक गटाला कौशल्य प्रशिक्षण केंद्रात शिकणारा एक दादा मार्गदर्शक म्हणून होता तर प्रत्येक दोन गटात एक शिक्षक उपस्थित होते. (मुले वेगवेगळी यंत्रे हाताळत होती आणि त्यात स्पर्धा त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही योजना आवश्यक होती.) पुढचे तीन तास सर्व गट आपल्याला दिलेल्या समस्यांवर झगडत होती. शेवटी काय तयार होते याबरोबर च सगळी प्रक्रिया गटात कशी घडते आहे ह्याचे निरीक्षण आणि मूल्यांकन करण्यासाठी काही छुपे परीक्षक पण नेमलेले होते. जेवणात पण वेळ जाऊ नये म्हणून मग प्रत्येक गटातले विद्यार्थी क्रमाक्रमाने जेउन आले.

दुपारी अडीच नंतर एकेका गटाचे काम पूर्णत्वाला गेले, सर्वांनी आपल्या कामाचा अहवाल (रेखाटन, बिल ऑफ मटेरियल यांसकट) तयार केला. यापैकी बिल ऑफ मटेरियल नीट लिहिले आहे की नाही हे तपसायचे काम मध्यवर्ती अर्थ कार्यालयातून खास आलेल्या दोन ताईंनी केले. तोपर्यंत दोन्ही शाळांमधले बाकी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मुख्याध्यापक असे सगळे पण आपल्या मित्र मैत्रिणी विद्यार्थ्यांनी काय काय केले आहे हे बघायला येऊन पोचले.

एकेक गटाचे अंतिम परीक्षण पण पूर्ण झाले. तोपर्यंत मा. कार्यवाह सुभाषराव, श्री भाऊ कुलकर्णी, ब्लूम कंपनीचे (कंपनीच्या अर्थ साहाय्यातून हा उपक्रम सुरु आहे) अधिकारी असे सगळे पण दाखल झाले. बक्षीस वितरण सभेत शिवापुर गावातलेही नागरिक आले होते.



सभेच्या कार्यक्रमामध्ये मा. सुभाषराव, ब्लुम इंडिया कंपनीचे MD श्री. राहुल पाठव, मा. भाऊ कुलकर्णी, मुख्य परीक्षक श्री. अमर दादा परांजपे व श्री. खासबागे सर यांनी या उपक्रमाविषयी व आजच्या स्पर्धेविषयी त्यांचे विचार मांडले व मार्गदर्शन केले. तसेच दोन्ही शाळांचे प्राचार्य कार्यक्रमास उपस्थित होते व त्यांनीही उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला. सभेसाठी दोन्ही शाळांमधील इतर विद्यार्थी व शिक्षकही उपस्थित होते. या सगळ्या छोट्या इंजीनियरनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सारखे मोठे इंजीनियर झाले पाहिजे असे मा सुभाषरावांनी सांगितले.बक्षीस मिळवलेल्या मुलांना ट्रॉफी तर शाळेला हत्यारे सेट बक्षीस म्हणून दिला गेला. एकूण सर्वच कार्यक्रम खूप उत्साहात पार पडला.

पहिलेच वर्ष असल्याने आपण प्राथमिक स्वरुपात हा उपक्रम केला आहे, परंतु हा उपक्रम अजून शाळांपर्यंत पोहोचला पाहिजे या हेतूने येत्या शैक्षणिक वर्षात आपण नव्याने ४ शाळांमध्ये हा उपक्रम सुरु करणार आहोत.


No comments yet.

Add a comment
Ctrl+Enter to add comment